नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी लागू करण्यात अल्याने रस्ते ओस पडले आहे. यातच रस्त्यावरील भटक्या गायी, माकड आणि कुत्र्यांसह इतर प्राण्यांचे अन्न पाण्याविना उपासमार सुरू आहे. कोरोना संकटादरम्यान काही नागरिकांनी आग्रा शहरामधील हजारो भटक्या गायी, कुत्री आणि माकडांना हिरवा चारा, टोस्ट आणि केळी असा अन्न पुरवठा केला आहे.
लॉकडाऊन झाल्यामुळे काही संस्थांनी शहरातील कामगार आणि गरिबांना अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकांबरोबर प्राण्याचेही अन्नाविना हाल होत आहेत. आग्रामधील माकडे भूकेने व्याकूळ झाले असून ते मार्गावरून जाणाऱया लोकांवर हल्ले करत होते. पंडीत जुगल किशोर यांच्या पुढाकारातून या प्राण्यांना अन्न पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे.