पणजी - कोरोनामुळे देशभरात पाचव्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 1 जूनपासून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गोव्यामध्ये येत्या काळात रेल्वे आणि फ्लाईटची संख्या मोठ्य़ा प्रमाणात वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
1 जूनपासून दिल्ली आणि मुंबईतून सुटणाऱ्या प्रत्येकी तीन रेल्वे गाड्या दक्षिण गोव्यातील मडगावला येतील, असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले. याशिवाय दिल्ली ते एर्नाकूलमला जाणारी मंगला एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेसही गोव्यात येतील, असे त्यांनी सांगितले. नवी दिल्ली वास्को एक्सप्रेसही 1 जूनपासून सुरू होत आहे.
प्रवाशांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार प्रवाशांनी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे, किंवा राज्यात प्रवेश केल्यानंतर तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
विविध जहाजांवर काम करणाऱ्या 200 भारतीय नागरिकांना घेऊन श्रीलंकन एअरलाईन्सची दोन विमाने उद्या(सोमवारी) गोव्यात उतरणार आहेत, असे गोवा सीमॅन असोशिएशनचे अध्यक्ष डिक्सॉन वाझ यांनी सांगितले. तसेच दुबईत अडकलेल्या भारतीयांना गोव्यात माघारी आणण्यासाठी विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. विविध देशांमध्ये अडकेले गोव्याचे नागरिक माघारी येण्यासाठी सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहेत, अशा 7 ते 8 फ्लाईट आहेत. जगभरात विविध ठिकाणी जहाजांवर काम करणारे 800 गोवावासी आधीच माघारी परतले आहेत.