नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे 33 हजार ५० रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार ७४ रुग्ण दगावले आहेत. एकूण रुग्णांपैकी २३ हजार ६५१ अॅक्टिव्ह केसेस असून ८ हजार ३२४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
मध्यप्रदेशातली इंदौरमध्ये काल(बुधवार) दिवसभरात १९ नवे कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे रुग्णसंख्या १ हजार ४८५ झाली आहे. तर शहरामध्ये ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण जिंदाल यांनी आणखी ३ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. राज्यामध्ये आत्तापर्यंत २ हजार ५६० कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच ईशान्य भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाष्ट्रात ९ हजार ९१५ तर गुजरातमध्ये ४ हजार ८२ रुग्ण आढळून आले आहेत.
सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत.
सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.