श्रीनगर - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. जम्मू काश्मीरमधील 5 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे.
एसएमएचएस रुग्णालयातील 3 , शासकीय दंत महाविद्यालयातील 1, एसकेआयएमएस बेमिना येथील 1, असे 5 डॉक्टर कोरोनाबाधित आढळले आहेत. आता राज्यात रुग्णांची संख्या 1 हजार 189 वर पोहोचली आहे.
यापूर्वी रविवारी 55 कोरोनाबाधित आढळले होते. त्यामध्ये 14 पोलिसांसह एका गर्भवती महिलेचा समावेश होता. तसेच काश्मीर विभागात एका युवतीचा मृत्यू झाला होता. एकूण संक्रमितपैकी 149 जम्मू विभागात आणि 1 हजार 40 काश्मीर विभागात आहेत.
दरम्यान देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 96 हजार 169 झाला आहे, यात 56 हजार 316 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 36 हजार 823 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 3 हजार 29 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.