नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी आपल्या घरातूनच नमाज अदा करावा, असे आवाहन जमैत उलेमा-ए-हिंद संघटनेने केले आहे. शुक्रवारी होणाऱ्या जुम्म्याच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.
जमैत उलेमा-ए-हिंद संघटनेचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदानी यांनी मुस्लीम बांधवांना हे आवाहन केले आहे. मागील आठवड्यात ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातूनच नमाज अदा केला होता, त्याचेच अनुकरण याही शुक्रवारी करावे असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच कोरोनाला हरवायचे असल्यास, केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करा, असेही ते म्हटले.
अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इल्यासी यांनीही मुस्लीम समुदायाला सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच लॉकडाऊन कालावधीदरम्यान आपापल्या घरामधूनच नमाज अदा करावा असेही त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील शुक्रवारीही अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लोकांना मशिदीत न जाता आपापाल्या घरातूनच नमाज अदा करण्यास सांगितले होते.
हेही वाचा : समाजभान! पोलीस विभागाकडून 5 हजारांपेक्षा अधिक मास्क तयार