नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2 हजार 902 वर पोहचली आहे. तर 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2 हजार 902 एवढी झाली आहे. यातील 2 हजार 650 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 183 जण पूर्णत: बरे झाले असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सुधारित आकडेवारी जाहीर केली.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 423 वर पोहोचला आहे. तसेच तामिळनाडूमध्ये 411 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर दिल्लीमध्ये 386, केरळमध्ये 295, कर्नाटकमध्ये 88, गुजरातमध्ये 64, दिल्लीमध्ये 61, तेलंगणात 158 अशी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त रुग्ण कोरोनामुळे मरण पावले आहेत. महाराष्ट्रामध्ये 19, गुजरातमध्ये 9, दिल्लीमध्ये 6 तर मध्यप्रदेशमध्ये 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वरती गेला आहे. या कार्यक्रमाला गेलेल्या 600 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.