नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनातील एक स्वच्छता कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यानंतर परिसरातील जवळपास 100 नागरिकांना क्वारंटाईन केले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. चार दिवसांपूर्वीच हा कामगार कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिव स्तरावरील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. तर, तेथील कामगारांना दिल्लीतील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान स्वच्छता कामगाराशिवाय इतर सर्वांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.
आज सकाळपर्यंत दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजारांहून अधिक झाला आहे. यात ५९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या २४ तासात ४७ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर, दिल्ली सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.