अहमदाबाद- देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या काळात वैद्यकीय उपचार सेवा कमी पडू नये यासाठी रेल्वे प्रशासन ७० रल्वे कोचेसचे रुपांतर विलगीकरण कक्षात करणार आहे. हे कोचेस अहमदाबाद रेल्वे विभागातील रुग्णांसाठी तयार करण्यात आले असून सर्व वैद्यकीय उपकरणांसह सुसज्ज असलेले पहिले कोच मनीनगर रेल्वे आगारात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अहमदाबाद रेल्वे विभागाचे व्यवस्थापक दीपक कुमार यांनी दिली.
विलगीकरण कोचेस ५ आगारांमध्ये ठेवण्यात येणार आहे. मनीनगर आगारामध्ये २५ कोचेस ठेवण्यात येणार आहे. या कोचेसमध्ये ८ रुग्णांचे विलगीकरण होऊ शकते. कोचेसमध्ये सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक कोच मधील ४ पैकी एक शौचालयाचे रुपांतर बाथरूम मध्ये करण्यात आले आहे. त्याचबरोबर, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. कोरोनाचे जे रुग्ण गंभीर आजारी आहेत त्यांना रुग्णालयात हालवावे लागेल, मात्र, ज्यांची प्रकृती चिंताजनक नाही, अशांना या कोचेसमध्ये भरती करण्यात येईल, अशी माहिती अहमदाबाद रेल्वे विभागाचे व्यवस्थापक दीपक कुमार यांनी दिली.
तसेच, ५ हजार रेल्वे कोचेसचे रुपांतर आम्ही विलगीकरण कक्षात करणार आहोत, असा दावा दीपक कुमार यांनी केला आहे. मनीनगर व्यतरिक्त विलगीकरण कोचेस अहमदाबाद आणि साबरमती रेल्वे आगारातही असणार आहेत. त्यांच्या व्यतरिक्त कछ जिल्ह्याच्या भूज आणि गांधीधाम या ठिकाणी देखील हे विलगीकरण कोचेस असणार आहेत.
हेही वाचा- कोरोनाचा विळखा.. उपचार करणाऱ्या दोन परिचारिकांनाच लागण