लखनऊ - उत्तर प्रदेशातील बांदामध्ये एका १९ वर्षीय तरूणीला आणि तिच्या प्रियकराला जिवंत जाळल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुंबाने दोघांची हत्या केली असून हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बांदा जिल्ह्यातील कर्रचा गावामध्ये बुधवारी हा प्रकार झाला. मुलीच्या कुटुंबियांनी दोघांना आपत्तीजनक अवस्ठेमध्ये पाहिल्यानंतर त्यांनी दोघांना एका झोपडीमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर झोपडीला आग लावण्यात आली, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक महेंद्र प्रताप सिंग यांनी दिली.
दोघेही या घटनेत गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे भोला(वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला तर ८० टक्के भाजलेल्या मुलीला उपचारासाठी कानपूरला पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे, असेही सिंग यांनी सांगितले.