नवी दिल्ली - देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारने आज आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे. लॉकडाऊननंतर गरीब व असंघटीत कामगारांच्या कुटूंबांसमोर उदरनिर्वाहाचा कठीण प्रश्न उभा ठाकला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सर्वसामान्यांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत आज घेण्यात आला. याबाबतची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जावडेकर यांनी सांगितले की, 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एक लाख 80 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही सगळी रक्कम राज्यांना पुढच्या 3 महिन्यांसाठी आगाऊ देणार आहे. लॉक डाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
जावडेकर यांनी सांगितले, की देशातील जवळपास ८० कोटी जनतेला याचा फायदा होणार आहे. प्रतिव्यक्ती ७ किलो राशन पुरविण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांचे धान्य आधीच पुरविण्यात येणार आहे.