कोरोना विषाणूच्या उद्रेक झालेला असताना तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. भारत आणि इराणकडून त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांमध्ये 240 काश्मिरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अडकलेल्या भारतीय नागरिकांचे सॅम्पल स्वॅब घेऊन जाणारे पहिले इराणी विमान शनिवारी सकाळी तेहरान आयकेआयए विमानतळावरुन नवी दिल्लीकडे उड्डाण करण्याची शक्यता आहे. यापुर्वी इराणने भारतीय नागरिकांना सोडण्यापुर्वी आपल्या भूमीवर त्यांची चाचणी करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारतीय आरोग्य मंत्रालयातील 6 तज्ज्ञांच्या व्हिसास मंजुरी देण्यात आली होती. हे तज्ज्ञ तेहरानला जाऊन आवश्यक वैद्यकीय चाचण्या करतील.
वैद्यकीयदृष्ट्या चाचणी झालेले स्वॅब्स नवी दिल्लीत पोहोचले की, एनकोव्हिड19 (nCovid19) चाचणी नकारात्मक आलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवण्यात येईल. ज्यांची चाचणी सकारात्मक आली आहे किंवा याबाबत संशय आहे, अशा नागरिकांना इराण सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रगत वैद्यकीय केंद्रात दाखल केले जाईल.
"भारताच्या नागरी उड्डाण संचालनालयाने सर्व इराणी विमानांना भारतात उड्डाणाविषयी निर्बंध घालण्याबाबत 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या घोषणेनंतर, इराण सरकारने ताबडतोब मानवतावादी दृष्टिकोन आणि समस्येची निकड विचारात घेत, तसेच आरोग्याचे प्रोटोकॉल लक्षात घेत, अडकलेल्या दोन्ही देशातील नागरिकांची तातडीने सुटका करण्यासाठी काही विमाने पाठविण्याची संपुर्ण तयारी दर्शवली आहे", असे दूतावासाने सादर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
तेहरानवरुन नवी दिल्लीला येणारे विमान इराणी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत घेऊन जाणार आहे. यादरम्यान, संबंधित देशांमधील नागरिकांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नवी दिल्ली आणि मुंबई येथे "अधिक आणि मुबलक" विमानांचा विचार करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. दोन्ही देशांमध्ये मर्यादित प्रमाणात व्यावसायिक उड्डाणे सुरु करण्यासाठी कार्यपद्धतींसंदर्भात कामकाज सुरु आहे.
"आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय आवश्यक असलेल्या सध्याच्या गंभीर परिस्थितीत अडकलेले पर्यटक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसह सर्व नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी दोन्ही देश जवळून संपर्कात राहतील", असेही दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या भारतीय नागरिकांना परत पाठविण्यात आले आहे, अशा स्वरुपाचे वृत्त खोटे आणि निराधार असल्याचे इराणी दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.
या आठवड्यात भारत आणि इराण यांच्या ऐतिहासिक संबंधांमध्ये राजकीय तणाव पाहायला मिळाला. याचे कारण म्हणजे, इराणी परराष्ट्र मंत्री झारिफ आणि इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी दिल्ली येथे झालेल्या दंगलींबाबत तसेच 'मुस्लिमांच्या हत्येबाबत' आपल्या ट्विट्समधून तीव्र टीका केली. नाराज झालेल्या भारताने दिल्लीतील इराणी राजदूतास बोलावून आपला निषेध व्यक्त केला.