नवी दिल्ली - कोरोना व्हायसरच्या (विषाणू) धोक्यामुळे संपूर्ण चीनमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून परीपत्रक जारी करण्यात आले आहे. मंत्रालयाने हे पत्रक जारी करून चीनला जाणाऱ्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून काही सूचना केल्या आहेत.
कोरोना विषाणूची लागण असलेले 7 संशयित रुग्ण चीनमधून परतले आहेत. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले आहेत, असे मंत्रालयाने पत्रकामध्ये म्हटले आहे. तसेच मंत्रालयाने प्रवाशांना या कोरोना व्हायसरपासून बचाव करण्यासाठी काही आरोग्याविषयक सूचना केल्या आहेत.
राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिंनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चीन आणि हाँगकाँगहून परतलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असल्याची माहिती आहे.
दरम्यान 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त चीनमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या रोगामुळे आत्तापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८०० पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. व्हायरसच्या धोक्यामुळे देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संसर्ग पसरू नये म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही बंद ठेण्यात आली आहे.
काय आहे कोरोना व्हायरस ?
कोरोना विषाणुमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही.