नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांजवळ पोहचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 11 हजार 458 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे कोरोना प्रसाराचा नवा ‘वाईट विक्रम’ तयार झाला आहे. तर, 386 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
देशात 3 लाख 8 हजार 993 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 45 हजार 779 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 1 लाख 54 हजार 330 जण बरे झाले आहेत, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे किंवा ते स्थलांतरित झाले आहेत. तर, 8 हजार 884 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाऊन अधिक शिथिल करण्यात आल्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय, देशभरात जवळपास दोन महिने पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे देशभरातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. मात्र, यामुळे सार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी होण्यास सुरुवात झाल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोकाही वाढला आहे.