कोरोना निर्बंधांमुळे चीनमधील ७० लाखांहून अधिक कामगारांना चीनचे नवीन वर्ष साजरे करून परत येण्यापासून रोखण्यात आले आहे. याच्या परिणामी, हेनन, हुबेई, झेजियांग, ग्वानडाँग आदी ठिकाणच्या कारखान्यातील उत्पादन थंडावले आहे. हेनन प्रांतांत जगातील सर्वात मोठा आयफोन्स(अँपल) बनवणारा कारखाना आहे. वुहान, हुबेई राज्याची राजधानी असून तेथे जपानची गाडी बनवणारी कंपनी होंडा आणि निस्सान तसेच अनेक युरोपियन वाहन कंपन्यांनी कारखाने उभारले आहेत. जर्मनीच्या फोक्सवॅगन समूहाने बिजिंगमध्ये काम करणाऱया आपल्या साडेतीन हजार कामगारांना दोन आठवडे कारखान्यात न जाता घरीच बसून काम करण्यास सांगितले आहे. जर्मन स्थित बीएमडब्ल्यू, अमेरिकेची टेस्ला, ब्रिटनची जग्वार आणि लँडरोव्हर यांनीही आपापली कार उत्पादनांचे काम विस्कळीत झाल्याचे जाहीर केले आहे.
पुरवठा साखळीत बिघाड
चीनमध्ये विविध देशांसाठी कार, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक उपकरणे बनवणारे अनेक कारखाने आहेत. त्यापैकी बहुतेक कारखाने हे अमेरिका, जर्मनी, जपान आणि फ्रान्स या विकसित देशांनी उभारलेले आहेत. आज, एक वस्तु कोणत्याही एकाच देशात संपूर्णपणे बनवली जात नाही. तिचे सुटे भाग हे वेगवेगळ्या देशांमध्ये बनवले जातात. त्यांची जुळणी करून अनेक देशांना निर्यात केली जाते. उदाहरणार्थ, स्मार्ट फोनमधील कॅमेरे एका देशात तयार केले जात असतील तर, त्याचा स्क्रीन दुसर्या देशात तयार केला जातो.यालाच पुरवठा साखळी असे म्हटले जाते. तैवान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, बांगलादेश आणि मलेशिया हे या पुरवठा साखळीचे प्रमुख घटक आहेत.
कोरोनामुळे या साखळीवर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी, चीन आणि इतर देशांमधील आयात आणि निर्यात विस्कळीत झाली आहे. उदाहरणार्थ, कपडे आणि शुद्घ केलेले खाद्यपदार्थ चीनमधून जपानला निर्यात केले जातात. ते आता समस्येत सापडले आहेत. ह्युंदाई मोटर कंपनीला दक्षिण कोरियातील आपले काही कारखाने चीनमधून तारांच्या जाळ्यांचा पुरवठा होत नसल्याने बंद करावे लागले आहेत. अनेक आशियाई देशांमधील लोक सार्वजनिक बाजार, शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्सला अशा गर्दीच्या ठिकाणांना कोरोना विषाणुच्या हल्ल्याच्या भीतीने भेट देण्याचे टाळत आहेत. याचा परिणाम किरकोळ बाजारावर होत आहे. चीन सरकारने कोरोनामुळे पर्यटनावर बंदी घातली असून, अनेक देश चीनी पर्यटकांना प्रवेश नाकारत आहेत. यामुळे पर्यटन उद्योग उतरणीला लागला आहे. व्हिएटनाम, थायलंड आणि सिंगापूर या देशांमधील पर्यटन महसूल महत्वपूर्णरित्या घटणार आहे. कोरोना हल्ल्यामुळे सिंगापूर एक कोटी चीनी पर्यटकांना मुकणार आहे.
हाँगकाँग आणि मकाऊ यासारख्या व्यावसायिक केंद्रांचे खूप भारी नुकसान होणार आहे. थायलंडच्या प्रवासी सेवेचा जीडीपीमधील वाटा ११.२ टक्के आहे, हाँगकाँगचा ९.४ टक्के आहे. भारतात आणि इंडोनेशियात चीनी प्रवाशांचे येण्याचे प्रमाण कमी असल्याने, कोरोनाचा या दोन देशांमधील पर्यटनावर परिणाम तितकासा होणार नाही. दुसरीकडे, ब्रिटिश एअरवेज, लुफ्तांसा आणि एअर इंडिया यासह अनेक देशांमधील विमानसेवांनी चीनला विमान फेऱया बंद केल्या आहेत. किंवा कमी केल्या आहेत. जपानला पर्यटन आणि हवाई वाहतुकीमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे टोक्योमध्ये होणाऱया उन्हाळी ऑलिंपिकवर विपरित परिणाम होईल, याची चिंता सतावते आहे.
येत्या २४ मेपासून या क्रीडास्पर्धा सुरू होत आहेत. कार, औद्योगिक यंत्रे, उपकरणे, औषधे, गृहोपयोगी उपकरणे, संगणक, स्मार्ट फोन्स आणि इतर उच्च तंत्रज्ञानाच्या वस्तु आणि त्यांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणारा चीन हा प्रमुख केंद्र आहे. कोरोना परिणामामुळे, त्याचे कार उत्पादन २०२० च्या पहिल्या तिमाहीत १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कारचे सुटे भाग बनवणार्या बॉश, मॅग्ना इंटरनॅशनल आणि इलेक्ट्रॉनिस्क उत्पादन करणाऱया एनविदियाही आपले उत्पादन घटवण्याची शक्यता आहे. अगोदरच निराशेने फटका बसलेल्या जगासाठी कोरोना हे मोठे अरिष्ट ठरत आहे. कोरोना विषाणु चीनबरोबरच जागतिक जीडीपीही खाली आणू शकतो. जर्मनी-चीनला मोठ्या प्रमाणात अवजड यंत्रांची निर्यात करत असून त्यांच्याकडून मागणी खाली येण्याची शक्यता आहे.
संधींना प्रोत्साहन
चीनमधून मालाचा पुरवठा घटल्यामुळे अंशतः भारतातील काही विशिष्ट वस्तुंच्या पुरवठ्यासाठी जगातील देश भारतावर अवलंबून राहू शकतात. हा काहीसा दिलासा आहे. सिरॅमिक्स, गृहोपयोगी उपकरणे, फॅशन, जीवनशैली वस्तु, कपडे, लहान स्तरावरचे अभियांत्रिकी आणि फर्निचर निर्यात करण्याची भारताची क्षमता आहे. अगोदरच, पाश्चात्य कंपन्या भारताच्या संपर्कात आहेत. कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी मुखवट्यांसाठी(मास्क्स) मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहेत. सुरूवातीला, भारत सर्व मास्क निर्यात केले तर, आम्हाला आमच्या गरजांना अनुरूप मास्कचा तुटवडा जाणवेल, अशी शंका भारताला होती. म्हणून निर्यात थांबवण्यात आली होती. परंतु, मागणी इतकी जास्त होती की भारतीय उत्पादक नवी मागणी पुरवण्यास असमर्थ होते. भारताला जगासाठी चीनप्रमाणे कारखाना बनण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करण्यासाठी काम करावे लागेल.
आज, चीन जागतिक निर्यातीपैकी १०.४ टक्के मालाची निर्यात करतो. २००२ मध्ये चीनचा आयातीतील वाटा अवघा ४ टक्के होता. त्यामुळे कोरोना विषाणुमुळे होणारे नुकसान हे २००३ मध्ये झालेल्या सार्स विषाणुपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. २००३ पेक्षा आज चीनचे महत्व जागतिक अर्थव्यवस्थेला अधिक आहे. चीनचा जागतिक जीडीपीमधील वाटा १५ टक्के आहे. यात काही कपात झाली तर त्याचा फटका जागतिक जीडीपीला बसणार आहे. चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. २०१८-१९ मध्ये, भारताची चीनकडून होणारी एकूण आयात १४ टक्के होती. भारताची चीनला याच कालावधीत होणारी निर्यात ५ टक्के होती. कोरोनाची समस्या कायम राहिल्यास, निर्यात आणि आयात घसरणीला लागेल. चीनमधील सुट्या भागांचे उत्पादन घटले असून पुरवठादारांनी किमती वाढवल्या आहेत. यामुळे भारतात महागाई वाढणार आहे, उत्पादन कमी होऊन नोकऱयांमध्ये कपात होणार आहे. जेव्हा जगातील देश आर्थिक दृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असताना, कोरोना पेचप्रसंगावर परस्पर सहकार्यानेच मात करता येईल.
भारतातील अटळ अडचणी
भारत, चीनमधून कच्चा मालाची आणि सुट्या भागांची आयात करून साठा करतो. त्यामुळे तो अल्पमुदतीच्या दुष्परिणाम टाळता येतील पण भविष्यातील तोटे टाळता येणार नाहीत. भारत मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी माल आणि रसायने चीनमधून आयात करतो. आयात विस्कळीत झाल्यामुळे, भारतीय कंपन्यांची वृद्घी २०२०-२१ मध्ये मंदावण्याची शक्यता आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही तर, भारतीय कंपन्या संकटाच्या परिस्थितीतून सुटणार नाहीत. भारत पुढील वित्तीय वर्षात ६.५ टक्के वाढीच्या दराची अपेक्षा करत आहे. पण कोरोनावर सहा महिन्यात नियंत्रण मिळवले नाही तर, भारताच्या वाढीची शक्यता साध्य करणे अवघड आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारूती कारचे उत्पादन चीनमधून सुट्या भागांच्या आयातीत अडथळा निर्माण झाल्याने मंदावू शकते.
कोरोनाच्या भीतीमुळे चीनमधील ६० टक्के वाहनांच्या सुट्या भागांच्या जुळणीचे काम बंद असल्याने, इतर देशांकडून आणखी काही काळ इतर देशांकडून सुट्या भागांची आयात करावी लागेल. चीनमधून भारत वाहनांची उपकरणे १० ते ३० टक्के इतक्या प्रमाणात आयात करतो. चीनवर आम्ही विद्युत वाहनांच्या उत्पादनासाठी बॅटऱया आणि इतर सुट्या भागांवर अवलंबून आहोत. कोरोनाच्या परिणामामुळे भारतीय वाहन उद्योग आणखी ८ टक्क्यांनी उतरणीला लागेल, असा फिचने ईशारा देऊन ठेवला आहे.
हिरे, चामड्यांच्या वस्तु आणि औषधे उत्पादन यावर होणारा परिणाम अत्यंत तीव्र असेल. पादत्राणांचे सोल चीनमधूनच आणले पाहिजेत. चीनमधून सौर पॅनल्सचा पुरवठा कमी झाला तर, भारत सौर उर्जेच्या उत्पादनात मागे पडेल. शीतकरण यंत्रे, कपडे धुण्याचे यंत्र, दूरचित्रवाणी संच आणि स्मार्ट फोन्स यांचे सुटे भाग चीनमधून आयात केले जातात. सुट्या भागांच्या अपुर्या पुरवठ्यामुळे या वस्तुंच्या किमती वाढू शकतात. जियोमी ही अगोदरच स्मार्ट फोन्सच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणात औषधे आणि एपीआयसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. कोरोना विषाणुमुळे त्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या परिस्थितीत, औषधांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला असून किमतवाढ अटळ असल्याचे दिसत आहे. पॅरासेटामोलसारख्या कच्च्या मालाच्या किमती दहा दिवसांत अगोदरच दुप्पट झाल्या आहेत. भारताने कोरोना पेच हा खडबडून जाग येण्यासाठी असलेला धोक्याचा ईशारा समजावा आणि मोठ्या प्रमाणात औषधे एपीआय आणि वैद्यकीय उपकरणे आपल्याच भूमीत तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या पाहिजेत.