लंडन - कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक रात्रंदिवस संशोधन करत आहेत. दरम्यान, सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूच्या विरोधातील लस बनविण्यात यश येईल, असा दावा ऑक्स्फर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. कोरोना विषाणूवरील लस बनविण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. मात्र, त्याआधीच लस शोधून काढण्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
लस विकसीत करणाऱ्या पथकाचे प्रमुख संशोधक प्रो. सारा गिलबर्ट यांनी सांगितले की, सीएचएडीओएक्सवन (ChAdOX1) तंत्रज्ञान वापरून ही लस कोरोनाविरोधात यशस्वीपणे वापरता येईल. त्यानुसार सप्टेंबरपर्यंत 10 लाख लसी उपलब्ध होतील. माध्यामांमध्ये यासंबधीचे वृत्त आले आहे.
एका इंग्रजी माध्यमामध्ये आलेल्या वृत्तानुसार, सीएचएडीओएक्सवन ही जगातील चौथी कोरोना विरोधी लस आहे. ही लस क्लिनिकल ट्रायलमधून जात आहे. म्हणजेच माणसावर लसीचे काय परिणाम होतात, हे पाहण्यास सुरुवात झाली आहे. इतर तीन लशींपेक्षा सीएचएडीओएक्सवन लस मोठ्या प्रमाणात तयार करता येऊ शकते. मात्र, जरी लस तयार झाली तरी दीड वर्षांनंतर ही लस मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होईल, असे म्हटले आहे.
गिलबर्ट यांनी सांगितले की, वेगवेगळ्या आजारांविरोधात सीएचएडीओएक्सवन तंत्रज्ञानाचा उपयोग करून 12 क्लिनिकल ट्रालय करण्यात आल्या आहेत. त्यातून काही चांगले निष्कर्ष हाती आले आहेत.
ऑक्स्फर्ड विद्यापीठातील वैज्ञानिक या लसीबाबत खूप आश्वासक आहेत. क्लिनिकल ट्रालय सुरू करण्याआधीच या लसीचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. प्रोफेसर एड्रिलन हिल यांनी सांगितले की, संशोधकांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन सुरू केले आहे. ट्रालय यशस्वी झाल्यावर लसींची कमतरता भासू नये म्हणून आधीच उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.
या लसीचे उत्पादन अल्प प्रमाणात नाही तर तर जगभरातील सात मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने उत्पादनाचे काम सुरू केले आहे. लस विकसीत करण्याच्या तिसऱ्या टप्प्यात 510 स्वयंसेवकांवर ती वापरण्यात येणार आहे. या अभ्यासात 5 हजार स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे.
गिलबर्ट यांच्या पथकाला इंग्लमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च आणि युके रिसर्च अॅड इनोवेशन संस्थेकडून 22 लाख पौंडांचे अनुदान मिळाले आहे. संशोधन जलद विकसीत करण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे.