नवी दिल्ली - 'मॉब लिंचिंगच्या घटनांमधून हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्याचे मोठे कारस्थान' सुरु असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. अखिल भारतीय सामाजिक सद्भाव समितीकडून वृंदावन येथील वास्तल्य गावामध्ये आयोजित केलेल्या दोन दिवसीय बैठकीत ते बोलत होते.
'मॉब लिंचिंगच्या नावाखाली समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू असून काही राज्यामध्ये एका योजनेअंतर्गत धर्म परिवर्तनही केले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे,' असे सरसंघचालक भागवत यांनी म्हटले आहे. याचबरोबर 'विविध जातीमधल्या लोकांनी एकत्र येत समाजातील भेदभाव दूर करावा. यामुळे सामाजिक समस्या दूर होतील,' असे भागवत म्हणाले.
या बैठकीला भारतीय सामाजिक सद्भाव समितीचे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, त्रिपुरा आणि मेघालयसह अन्य राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.