जयपुर (राजस्थान) - राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) पुन्हा सकाळी दहा वाजता काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काल (सोमवारी) रात्री माध्यमांना ही माहिती दिली. पक्षाचे वरिष्ठ नेता अविनाश पांडे, अजय माकन यावेळी उपस्थित होते.
यावेळी सुरजेवाला म्हणाले, मंगळवारी पुन्हा पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक हॉटेल फेयरमाउंट येथे होईल. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह सर्व आमदार आणि मंत्री यांना बोलावण्यात येईल. त्यांना फोनद्वारे किंवा लिखित सुचना पाठवून बोलावण्यात येईल.
तर राज्यातील काँग्रेस आमदारांनी अनेक समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र पाठवून समर्थन दिले आहे, अशी माहितीही सुरजेवाला यांनी दिली. तर सोमवारी जे आमदार बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित रहावे. तसेच जे आमदार दिल्ली किंवा मानेसर येथील हॉटेल येथे उपस्थित आहेत मग त्यात उपमुख्यमंत्री सचिन पायलट असोत किंवा अन्य त्यांनी सकाळी 10 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित रहावे. तसेच राज्यसरकारवर कोणतेही राजकीय संकट नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - राजस्थानमधील राजकीय गोंधळ; बैठकीसाठी काँग्रेसकडून 'व्हीप' जारी
ते म्हणाले, जर कुणाला काही काही समस्य़ा किंवा काही मतभेद असतील तर त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करावी. चर्चेसाठी त्यांचे दरवाजे नेहमी खुलेच आहेत. त्यांचा विचार त्यांनी पक्षाध्यक्षांसोबत मांडावा.
दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री निवास येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीत आमदारांनी व्हिक्टरी साईन दाखवत सरकार स्थिर असल्याचे दर्शवले. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यामुळे आज (मंगळवारी) होणाऱ्या आमदारांच्या बैठकीला सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीटीपी पक्षाच्या आमदारांनीही समर्थन काढले -
राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्ष जोरावर असल्याचे दिसत असतानाचा काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय ट्रायबल पक्ष (बीटीपी) च्या दोन आमदारांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही कोणत्याच पक्षासोबत तसेच कोणत्याही व्यक्तिसोबत नाहीत. राज्यात बीटीपीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. राजकुमार रोट आणि रामप्रसाद अशी या दोन आमदारांची नावे आहेत.