नवी दिल्ली - गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. यावेळी युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एसपीजी सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा झाली. गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यामध्ये गांधी कुटुंबीयांचाही समावेश होता.
कशी असते एसपीजी सुरक्षा?
एसपीजी सुरक्षा व्यवस्थेद्वारे अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला देण्यात येते. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांकडे स्नायपर्स, बॉम्ब डिस्पोज करणारे तज्ज्ञ, असतात. एसपीजी मधील कमांडोना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले असते. तसेच त्यांच्याकडे आत्याधुनिक शस्त्रे असतात. एसपीजी सुरक्षा असणाऱ्या ताफ्यातील वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असते.