इंफाळ - मणिपूरमधील काँग्रेस विधिमंडळपक्षाचे नेते ओ. इबोबी सिंग यांनी राज्यात आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच भाजप सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजीनामा दिलेले भाजपचे तीन आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे राज्यातील भाजप सरकार संकटात आले आहे.
भाजप सरकरमधून राजीनामा दिलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या चारही मंत्र्यांच्या आम्ही संपर्कात आहोत, असेही कॉंग्रेस नेते म्हणाले. राज्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहोत. याबाबत विधानसभा अध्यक्ष यूमनाम खेमचंद सिंह यांच्याशी संपर्क साधला आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री वाय जॉयकुमार सिंह, आदिवासी आणि डोंगरी भाग विकास मंत्री एन. काईशी, खेळ मंत्री लेटपाओ होकीप आणि कुटुंब कल्याण मंत्री जयंत कुमार सिंह यांनी राजीनामे दिले आहेत.
एस. सुभाषचंद्र सिंह, टीटी होकीप, सॅम्युअल जेंडई या भाजप आमदारांनी राजीनामा दिला आहे, तर तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने आणि अपक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.