नवी दिल्ली - काँग्रेस पक्षातर्फे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राजस्थानमधून राज्य सभेत आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. ही जागा राज्यातील भाजप अध्यक्ष मदन लाल सैनी यांच्या मृत्यूमुळे रिकामी झाली आहे. सैनी यांची मागील वर्षी येथे भाजपची सत्ता असताना राज्यसभेवर निवड झाली होती.
सध्या काँग्रेसकडे राजस्थानच्या विधासभेत बहुमत आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांना येथून राज्यसभेचा उमेदवार बनवणे जवळजवळ निश्चित झाले आहे. याची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी राहिल्याचे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. तसेच, एका मंत्र्यानेही याला दुजोरा दिला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर डॉ. सिंग यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र, याविषयी डॉ. सिंग यांच्या कार्यालयात विचारणा केली असता, याविषयी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच, गेहलोत यांच्याशी केवळ सौहार्दपूर्ण भेट झाल्याचे सांगण्यात आले.
मनमोहन सिंग यांची २८ वर्षांपूर्वी आसाममधून राज्यसभेवर निवड झाली होती. मागील महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपला. त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी मागील महिन्यात काँग्रेसने डीएमके पक्षाकडे मदत मागितली होती.