भोपाळ - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटल्यामुळे भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. याबाबत बोलताना, मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या जर मध्य प्रदेशमध्ये आल्या, तर त्यांना आम्ही जिवंत जाळू अशी धमकी दांगी यांनी दिली आहे.
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याविरोधात देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठीच मध्य प्रदेश काँग्रेसनेही निषेध मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना दांगी म्हणाले की, प्रज्ञा ठाकूर यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही केवळ त्यांचा पुतळाच नाही, तर मध्य प्रदेशमध्ये जर त्यांनी पाऊल ठेवले, तर त्यांनाही आम्ही जाळू असे ते म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच देशाच्या संरक्षण सल्लागार समितीमध्ये निवड झालेल्या प्रज्ञा यांना, या वक्तव्यानंतर समितीमधून काढून टाकण्यात आले आहे. तसेच, संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या भाजपच्या संसदीय बैठकांनाही प्रज्ञा यांना उपस्थित राहता येणार नसल्याचे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले होते.
तर या सर्व प्रकारानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी ट्विट करत आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी स्वातंत्र्य सैनिक उधम सिंग यांच्याबाबत बोलत होते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.
हेही वाचा : गोडसेला 'देशभक्त' संबोधने भोवले; संरक्षण सल्लागार समितीतून 'प्रज्ञा ठाकूर'ची हकालपट्टी!