पणजी - गोव्याच्या राजकीय परिस्थितीत कोणतीही अस्थिरता निर्माण झालेली नाही. काँग्रेस मुद्दाम अस्थिरता असल्याची परिस्थिती निर्माण करत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर असून आमच्या समोर कुठलाही नेतृत्त्व बदलीचा प्रस्ताव आलेला नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर बैठकीनंतर म्हणाले.
गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर लगेच भाजपकडून आमदारांची बैठक बोलवण्यात होती. गोव्यात २ लोकसभा आणि ३ विधानसभेच्या जागेवर निवडणूक होणार आहे. याच निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर आमदरांची बैठक बोलवण्यात आली असल्याचे गोवा भाजप कडून सांगण्यात आले आहे. या बैठकीला गोव्यातील वरिष्ठ मंत्र्यासह सर्व आमदार उपस्थित होते.
गोव्यात काँग्रेसकडे १७ आमदार असतांना सुद्धा सत्ता स्थापन करता आली नव्हती. ते आता १४ आमदार असतांना कसे काय सरकार स्थापन करु शकतील. असा उपरोधिक टोला विनय तेंडूलकरांकडून काँग्रेसला लगावण्यात आला.
गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. येथे भाजप सरकार चालवण्यास सक्षम नाही. शिवाय मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरही गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. आमचा पक्ष राज्यात सर्वात मोठा असल्याने आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असेही काँग्रेसने राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सद्या गोवा विधानसभेत काँग्रेसचे १४, भाजपचे १३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ३, गोवा फॉरवर्डचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १ आणि अपक्ष ३ अशी पक्षीय बल संख्या आहे.