नवी दिल्ली : गांधी कुटुंबीयांमार्फत चालवण्यात येणाऱ्या राजीव गांधी फाऊंडेशन आणि इंदिरा गांधी ट्रस्ट यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. त्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर देत भाजपच्या विवेकानंद फाऊंडेशन, इंडिया फाऊंडेशन आणि आरएसएसला मिळणाऱ्या देणग्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजीव गांधी फाऊंडेशनला (आरजीएफ) मिळणाऱ्या देणग्या या भारतीय जनता पक्षाच्या फाऊंडेशन्सला मिळणाऱ्या देणग्यांहून कित्येक पटींनी कमी आहेत. तसेच, आरजीएफबाबत सर्व माहिती ही लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. तेथील आर्थिक व्यवहारांबाबत कोणीही विचारू शकते, आम्ही त्यांना ती माहिती देण्यास बांधील आहोत. मात्र, अशा प्रकारचे प्रश्न हे विवेकानंद फाऊंडेशन, भाजप फाऊंडेशन, इंडिया फाऊंडेशन अशा संस्थांना विचारले जात नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ज्या खोऱ्याने देणग्या मिळतात त्यांबाबत त्यांची चौकशी कधीच होत नाही. त्यांना असे कोणते संरक्षण मिळाले आहे? असे मत काँग्रेस खासदार आणि प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केले.
याआधी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते राजदीप सिंह सुरजेवाला यांनीही वर उल्लेख केलेल्या संस्थांचे आर्थिक व्यवहार खुले करण्याची मागणी केली होती.
राजीव गांधी फाऊंडेशनबाबत स्पष्टीकरण देताना सिंघवी म्हणाले, की जेव्हा कधी सरकारने आरजीएफच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तेव्हा तेव्हा आम्ही ट्रकभरुन कागदपत्रे सादर केली आहेत. केंद्राच्या या दबावापुढे आरजीएफ झुकणार नसून, आपले समाजकार्य चालूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : गांधी कुटुंबीयांना दणका, राजीव गांधी ट्रस्टला आलेल्या निधीची होणार चौकशी