नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार मद्यविक्री दुकाने उघडण्यात येणार आहेत. दिल्ली सरकारनेही त्यासाठी काही अटी आणि नियम जाहीर केले असून त्यानुसारच ग्रीन झोन असलेल्या भागांमध्ये मद्यविक्री दुकाने सुरू करता येतील.
चार सरकारी संस्थांना शहरात मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. मद्यविक्रीला परवानगी मिळाली असली तरी गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार कन्टेनमेंट झोनमध्ये मद्यविक्री करता येणार नाही.
दिल्ली पर्यटन आणि वाहतूक विकास मंडळ, दिल्ली औद्योगीक आणि बांधकाम विकास महामंडळ, दिल्ली नागरी पुरवठा मंडळ आणि दिल्ली ग्राहक सहकारी संस्था या चार संस्थांना मद्यविक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीत मॉल वगळता परवाना असलेली ४५० मद्यविक्री दुकाने आहेत. या दुकानांमध्ये मद्यविक्री करताना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक गिऱहाईकामध्ये किमान सहा फुट अंतर असले पाहिजे. याबरोबरच दुकान बाजारात नसले पाहिजे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.