रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात झारखंडच्या रांचीमध्ये खटला दाखल झाला आहे. २०१४ च्या निवडणुकीदरम्यान खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत, रांचीच्या दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयामधील वकील हरेंद्र कुमार सिंह यांनी हा खटला दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकावेळी एका प्रचारसभेमध्ये खोटे आश्वासन दिल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी यांनी या सभेमध्ये बोलताना, देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणून देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये भरण्याचे आश्वासन दिले होते. जे त्यांनी पूर्ण केले नाही.
न्यायिक दंडाधिकारी ए. के. गुडिया यांच्या न्यायालयामध्ये हा खटला दाखल झाला आहे. दरम्यान, २०१४ नंतर मोदी आणि त्यांचे १५ लाख हा मुद्दा कायम चर्चेत राहिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागेच एका मुलाखतीत हे मान्य केले होते, की १५ लाख हा केवळ एक 'चुनावी जुमला' होता. देशाबाहेर किती काळा पैसा आहे, हे सांगण्यासाठी केवळ उदाहरणादाखल मोदींनी १५ लाखांची गोष्ट केली होती, असेही शाहांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा : 'मोदी कायम पाकिस्तानबद्दल बोलतात, ते काय पाकिस्तानातचे राजदूत आहेत का'?