इंदोर (मध्य प्रदेश) - इंदोर येथे मुनावर फारुकी या विनोदी कलाकारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. शहरातील कॉमेडी शोमध्ये हिंदु देवतांबद्दल अपमानकारक शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. फारुकीसह इतर चार कार्यक्रम जणांनाही अटक करण्यात आली. त्याला 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हिंदु देवी-देवतांची चेष्टा
गुजरातमधील कलाकार मुनावर फारुकी याला शुक्रवारी इंदोरमध्ये अटक झाली. त्याच्यासोबतच्या प्रभास व्यास, नलिन यादव आणि आयोजक अॅडविन अॅन्थनी यांनाही अटक केली. हिंदु रक्षक संघटनेचे संयोजक आणि भाजपा आमदार मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य गौर यांनी याबाबत तक्रार दिली होती. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा हिंदु देवी-देवतांची चेष्टा करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी व्हिडिओ रेकोर्डिंग करून आम्ही लोकांना तिथून जाण्यास सांगितले, असे गौर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. त्यानंतर आम्ही या कार्यक्रमाचे विनोदी कलाकार आणि आयोजकांना पकडून पोलीस ठाण्यात नेले, असेही ते म्हणाले.
विनापरवानगी कार्यक्रम
आरोपीने हा कार्यक्रम विनापरवानगी सुरू करून देवदेवतांची मस्करी केली. त्यांना शुक्रवारी अटक करून शनिवारी कोर्टासमोर दाखल केले. कोर्टाने त्यांची रवानगी 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत केली आहे, असे वकील दिनेश पांडे यांनी सांगितले.
हेही वाचा - मकर संक्रांतीला सुरू होणार अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम