पणजी - नील, धवल आणि हरित क्रांतीच्या माध्यमातून गोव्याचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच प्लास्टिक आणि कचरा मुक्त करून सुवर्ण आणि सुसज्ज गोवा निर्माण करण्यासाठी प्रत्येक गोमंतकियांचे योगदान गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आझाद मैदानावर आयोजित गोवा क्रांती दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नील, धवल आणि हरित क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच गोवा कचरा आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सरकारने घटकराज्य दिनाचे औचित्य साधून 'स्वच्छ गोवा- हरित गोवा' अभियानाला सुरुवात केली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या माध्यमातून चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. हरित गोवा करताना ज्यांची वृक्ष लागवडीची मागणी असेल त्यांना तेथे वृक्ष देखील उपलब्ध करून देण्यात येतील. शेती ओसाड राहू नये यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात 'सामुहिक शेती' विषयावर चर्चा केली जाणार असल्याचे सावंत म्हणाले.
सरकार गोमंतकियांना १०० टक्के नोकरी देऊ शकत नाही. मात्र, नोकरी करायची इच्छा असलेल्यांना नोकरी मिळावी यासाठी रोजगाराला प्राधान्य देणारे शिक्षण दिले जाईल. तसेच विकासासाठी पुढील २५ वर्षांत आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्याबरोबरच गोवा मुक्ती संग्रातील सैनिकांच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी एकाद्या सरकारी इमारतीत दालन सुरू करण्याची घोषणाही केली.
मयेवासियांना लवकरच सनदी देणार -
गोवा परकियांच्या ताब्यातून मुक्त होऊन साठ वर्षे होत आली तरीही डिचोली तालुक्यातील मये गाव आजही कागदोपत्री पोर्तुगीज अंमलाखाली आहे. तेथील लोकांना जमीन अथवा शेती विषयक कोणतेही अधिकारी नाहीत. त्यामुळे आपल्या मालकीच्या जमीन आपल्याला मिळाव्यात यासाठी मयेवासीय सातत्याने लढा देत आहेत. त्याची दखल घेत संबंधितांना लवकरच सनदी दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.