पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राज्यात पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालू यादव आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. 'काही जणांनी सत्तेत आल्यानंतर कमाई केली. मात्र, त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला गादीवर बसवले. घोटाळे करणारा कोणी असेल तर, तो कारागृहातच जाईल, असे नितीश म्हणाले. शिकण्याची इच्छा असेल तर, आपल्या वडिलांना विचारा, त्यांनी एक तरी शाळा उभारली का? असे ते तेजस्वी यादव यांना उद्देशून म्हणाले.
आज अनुभव नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री होण्याचा दावा करत आहे. त्यांच्याकडे कोणताचा राजकीय अनुभव नाही. प्रसिद्धी मिळावी, म्हणून ते माझ्याविरोधात प्रचार करत आहे. कारण, याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. मात्र, मला विकासाशिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टीत रस नाही, असे नितीश कुमार म्हणाले.
बिहार निवडणूक तीन टप्प्यांत -
243 सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी 10 नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात 28 नोव्हेंबरला 71 विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 78 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.