गुवाहटी - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊन यशस्वीपणे राबविल्याबद्दल गुवाहाटी पोलिसांनी केलेल्या कार्याचे आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कौतूक केले आहे.
देशात कोरोनाचा प्रसार होण्यापुर्वीच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गुवाहटी पोलिसांनी चीनवरून परतलेल्या 3 नागरिकांना 28 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले होते. याबाबत सर्वानंद सोनोवाल यांनी पोलिसांच्या कारावाईचे कौतूक केले.
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गुवाहाटी येथे दररोज 5 हजार लोकांना अन्न वाटप करण्यासाठी शहर पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांचेही सोनोवाल यांनी कौतुक केले. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजातील लोकांनी घरामध्ये नमाज पठण करावे, यासाठी जनजागृती करण्याचे सोनोवाल यांनी पोलिसांना निर्देश दिले.
राजस्थानमधील कोटा येथील 320 विद्यार्थ्यांसह एकूण 360लोकांना बसने राज्यात आण्यात येणार आहे. त्यांना परत आणल्यानंतर आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. तसेच गुवाहटीमध्ये अडकलेल्या सुमारे 5 हजार लोकांना 320 बसेसनी त्यांच्या राज्यात पोहचवले आहे. यामध्ये पोलिसांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.