नवी दिल्ली - लॉकडाऊन काळात विमानसेवा बंद पडल्यामुळे एअर इंडिया आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे पायलटचे पगार वेळेवर करणे कंपनीला शक्य होत नव्हते. अनेक पायलटचे पगार प्रलंबित आहेत. ही प्रलंबित थकबाकी तातडीने फेडण्याची मागणी एअर इंडिया पायलट्स असोसिएशनने नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच पायलट्सना तातडीने एअर इंडिया सोडण्याची परवानगी देण्याबाबतही विचारणा करण्यात आली आहे.
8 जुलैला भारतीय पायलट गिल्ड, एमसीएचे अधिकारी आणि एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह एक बैठक झाली. ज्या बैठकीत एअर इंडिया पायलट असोसिएशनने त्यांची सर्व थकबाकी देण्याची मागणी केली आहे.
एअर इंडिया पायलट्स असोसिएशनने आपल्या सर्व वैमानिकांना एक पत्र लिहून थकबाकी वेतनाबाबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. संपूर्ण थखबाकी देणे शक्य नसल्यास किमान 25 टक्के थकबाकी तरी द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.
एअर इंडिया कंपनीत भारतात सुमारे 2 हजार 500 कर्मचारी असून त्यातील 600 पायलट आहेत. आर्थिक संकटामुळे पायलटच्या पगारात मे आणि जूनमध्ये 40 टक्के कपात केली गेली होती.