नवी दिल्ली - मी तुमची याचिका अर्ध्या तासापासून वाचतोय. पण, याचिकेत काय लिहिलंय मला समजत नाही, असा उद्विग्न सवाल सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी ३७० कलमाला आवाहन देणाऱ्या याचिकाकर्त्याला केला आहे. एम. एल शर्मा या व्यक्तीने काश्मीरबाबतच्या ३७० कलमाला आवाहन देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
सरन्यायाधीशांना याचिकेमध्ये काय आहे, हे समजेनाच. त्यामुळे सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला धारेवर धरले. हे योग्य नसल्याचेही सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला सुनावले. दरम्यान, काश्मीरात पत्रकारांवर बंधन आणण्याच्या विरोधातील याचिकाही सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली आहे. सुरक्षा यंत्रणा परिस्थीतीवर नियंत्रण ठेवून आहेत, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले.
काश्मीरला विषेश दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू आहे. याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून किरकोळ आंदोलनाच्या घटना घडल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि हिंसाचार झाल्याचे वृत्त प्रशासनाने फेटाळले आहे.