नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर गेल्या 7 महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. अनलॉक-5 अंतर्गत राज्यातील चित्रपटगृहे आणि शाळा आजपासून पुन्हा उघडण्यात येत आहेत. याशिवाय धार्मिक समारंभ आयोजित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि छत्तीसगड यासारख्या राज्यात चित्रपटगृहे बंद राहतील. तर दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरातसह अनेक ठिकाणी चित्रपटगृहे सुरू होतील. तथापि, अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी गृह मंत्रालयाने राज्य सरकारवर सोपवली आहे. तथापि, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहात एक जागा सोडून प्रेक्षक बसवले जातील. संपूर्ण चित्रपटगृहातील फक्त 50 टक्के जागा बुक केल्या जातील.
दहा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी चित्रपट गृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पीव्हीआर सिनेमाच्या देशभरातील 71 शहरांमध्ये 845 स्क्रीन आहेत. पीव्हीआर गुरुवारपासून 487 स्क्रीन सुरू करणार आहे. इतर राज्येही लवकरच चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी देतील अशी अपेक्षा आहे, असे बुधवारी पीव्हीआरने म्हटलं आहे.
राजधानीतील चित्रपटगृहे मार्गदर्शक तत्त्वे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे अनुसरण करतील, अशी आशा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी व्यक्त केली होती. गोवा सरकारने केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुरुवारपासून सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु नवीन चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत चित्रपटगृहे सुरू होणार नाहीत, असे राज्यातील चित्रपटगृह मालकांचे म्हणणे आहे. तसेच गोव्यात 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे पुन्हा सुरू होतील, तर पुढील आदेश येईपर्यंत कॅसीनो बंद राहतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.