पाटणा - लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा जारी केला आहे. ३ टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या मथळ्याखाली लोकजनशक्ती पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्याच्या विकासासाठी काम करेल, असा विश्वास यावेळी चिराग यांनी व्यक्त केला. आमच्या पक्षाच्या 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या धोरणामुळे बिहारवासियांच्या अनेक अडचणी दूर होतील, असेही ते म्हणाले.
'आम्ही एक वेब पोर्टल सुरू करू. ज्याठिकाणी बेरोजगार विद्यार्थी नोकरीसाठी संपर्क साधू शकतील. युवा कमिशनची स्थापना करू. सर्वठिकाणी महिलांसाठी व्यक्तिगत स्वच्छतागृहे, कॅनलच्या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प यासारखी अनेक आश्वासने चिराग यांच्या एलजेपी पक्षाने दिली आहेत. लोकजनशक्ती पक्षाचा जाहीरनामा माझे वडील रामविलास पासवान यांच्या दृष्टिकोनातून आलेला आहे. शिक्षण, आरोग्य, तरुण, कायदा व सुव्यवस्था आणि बेरोजगारांना नोकरी हे माझ्या वडिलांची विकासदृष्टी होती, असेही चिराग यावेळी म्हणाले.
सत्तेत आल्यांतर मंजूर झालेल्या सर्व विभागांची पदे लवकरच भरली जातील. करारावर राज्य सरकारमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी नियमित केले जातील. पूर आणि दुष्काळ रोखण्यासाठी राज्यातील सर्व नद्या कालव्याद्वारे जोडल्या जातील, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. चुकीनेही नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर बिहार उद्ध्वस्त होईल', असेही चिराग म्हणाले. जनता दल युनायटेडसोबत मतभेद असल्याचे कारण पुढे करत लोकजनशक्ती पक्ष एनडीएमधून बाहेर पडला होता. नितीश कुमार यांच्यावर टीका करणारे चिराग मात्र भाजपबाबत मौन बाळगून आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही ते सांगतात.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजप आणि महागठबंधनेदेखील आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. २४३ जागांसाठी बिहारमध्ये ३ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.