नवी दिल्ली - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. याकाळात उद्योगधंदे, व्यवसाय, रोजगार सर्व काही ठप्प झाले. मात्र, सर्व देश बंद असतानाही मिझोरममार्गे होणारी सोन्याची, सुपारीची आणि अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या काही गोष्टी बंद झालेल्या नाहीत.
गेल्याच आठवड्यात एका व्यक्तीने माजी सैनिक असल्याचा बनाव करून मिझोरममधील सीमेवरील ट्रकची तपासणी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सैनिकांना संशय आल्याने त्यांनी त्या व्यापाऱ्याला आसाम रायफलच्या महासंचालकांशी व्हिडीओ फोनवरून संवाद साधण्यास सांगितले. त्यामुळे घाबरून त्या व्यक्तीने सोन्याचे दागिने असलेली काही पॅकेट सैनिकांना देऊ केली, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
आसाम रायफल्सने दिलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यापासून एकट्या मिझोरम सीमेवरून ५० कोटीपेक्षा जास्त किमतीची सुपारी, हेरॉईनसह बंदी घातलेल्या गोळ्यांची तस्करी रोखली आहे. या कारवायांदरम्यान म्यानमारच्या ३९ नागरिकांना आणि ९६ ड्रग पेडलर्सना ताब्यात घेण्यात आले आहे. म्यानमार-मिझोरम सीमेवरून आसाम रायफल्सने गेल्या दोन वर्षांत ८०० किलोपेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. हे सोने एकूण तस्करीच्या फक्त ५ ते १० टक्केच आहे. मिझोरममधून गेल्या दोन वर्षांत ४ ते ८ हजार किलो सोन्याची तस्करी झाल्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमा ही एके-४७ व एम-१६ यासारख्या शस्त्रांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध होती. मात्र, आता सुपारी, कोकेन, हेरॉईन, सोने यांचाही समावेश तस्करीमध्ये झाला आहे. भारत-म्यानमार सीमेवरून तस्करी करून हा माल दिल्ली, मुंबई आणि बंगळूरूसारख्या महानगरांपर्यंत पोहचवला जातो.
सोने उत्पादनात जगात चीन अग्रेसर आहे तर, भारत हा सोने खरेदी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सोने उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला चीनमधील युनान हा प्रांत म्यानमार आणि भारताच्या सीमेपासून जास्त दूर नाही. त्यामुळे याच सीमांचा वापर सोने तस्करीसाठी केला जातो. भारत-म्यानमार सीमांचा वापर करून होणारी विविध मालाची तस्करी रोखण्याचे खूप मोठे आव्हान आसाम रायफल्स समोर आहे.