नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. बीजू जनता दलाचे उपाध्यक्ष प्रसन्ना आचार्य यांनी सैन्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्यांनी चीनवरही निशाणा साधला. 'चीनने लक्षात घ्यावे की, हे 1962 नाही, तर 2020 आहे', असे प्रसन्ना आचार्य म्हणाले.
सतत चीनच्या कटांना धुळीस मिळवण्याचे कार्य भारतीय लष्कर करत असून हे लष्कारचे शोर्य आहे. चीन सरकार आणि त्यांची पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) मानसिकता धोकादायक आहे. चीनला इतरांच्या भूमीवर कब्जा करायचा आहे," विशेषत: भारताच्या. मात्र, त्यांनी हे विसरू नये की हे 2020 आहे 1962 नाही, असे प्रसन्ना आचार्य म्हणाले.
1962 ची आणि आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. गेल्या 60 वर्षात भारताने लष्कर, कूटनीति आदी गोष्टीमध्ये प्रगती केली आहे. कोणतीही परिस्थिती हाताळण्यास भारत सक्षम आहे. हे चीन सरकारने लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, नियंत्रण रेषेवरील सैन्याला चीनने आवर घालावा, अशी विनंती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी मंगळवारी चीनच्या आक्रमक भूमिकेवर वक्तव्य केले.