नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने ठाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमावादासंबंधी लष्करी कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे चर्चेचे घोंगडे भिजत पडले आहे. सीमारेषेवरील वादावर अंतिम तोडगा निघाला नसतानाही २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चीनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेवरील सैन्याला चीनने आवर घालावा, अशी विनंती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज चीनच्या आक्रमक भूमिकेवर वक्तव्य केले. ते म्हणाले, "नुकतेच चीनने सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारत घुसखोरीचा प्रयत्न केला. ही बाब राजनैतिक आणि लष्करी स्तरावरून चीनपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. चीनी सैन्याने सीमेवर शिस्त बाळगावी आणि कोणतीही भडकाऊ कृती करू नये."
"भारत आणि चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून लष्करी आणि राजनैतिक स्तरावरुन प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्री आणि विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठकीत ठरल्यानुसार, दोन्ही देशांनी वाद जबाबदारीने सोडवायचा आहे. सीमेवर शांतता कायम राहावी आणि परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून आक्रमक पाऊल उचलू नये. द्विपक्षीय कराराचे पालन करण्यात येईल असे ठरले आहे", अशी आठवणही श्रीवास्तव यांनी चीनला करून दिली.
दरम्यान, ब्रिगेड कमांडर स्तरावरील चर्चा भारत आणि चीनच्या लष्करात चुशूल माल्डो येथे सुरू आहे. पँगोंग सरोवराच्या दक्षिण भागातील स्थितीवर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ऑगस्ट २९/३० च्या रात्री चिनी सैनिकांनी आधीच्या बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांचे उल्लंघन करत भारतीय भूमीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील वातावरण तणावपूर्ण असल्याने भारतीय लष्करही सज्ज आहे. भारताने भू तसेच समुद्र सीमांवरही चीनची नाकेबंदी करण्याची तयारी केली आहे. दक्षिण चीन समुद्रातही भारताने आपली युद्धनौका पाठवली आहे.