नवी दिल्ली - सध्या भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यातील घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यातील चकमकीमध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. या चकमकीला चीनचे भारतीय राजदूत सन वेईंडोंग यांनी दुर्भाग्यपूर्ण करार दिला आहे. चीन भारताला स्पर्धक किंवा धोका म्हणून नाही, तर एक साथीदाराच्या आणि संधीच्या रुपात पाहतो, असे ते म्हणाले. भारत-चीन युथ फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
'काही दिवसांपूर्वी सीमा भागामध्ये एक दुर्भाग्यपूर्ण घटना घडली, असा काही प्रकार व्हावा, अशी भारतासह चीनचीही इच्छा नव्हती. परिस्थिती सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 70 वर्षांपूर्वी चीन आणि भारतादरम्यान राजकीय संबंध स्थापीत झाले होते. मात्र, आता द्विपक्षीय संबंध थोडे अस्थिर झाले आहेत. या नव्या काळात द्विपक्षीय संबंध न बिघडवता ती सुधारण्यावर भर द्यायाला हवा, असे ते म्हणाले.
चीन भारताला स्पर्धक किंवा धोका म्हणून नाही, तर एक साथीदाराच्या आणि संधीच्या रुपात पाहतो. दोन्ही देशांमधील मतभेद दूर करून संवादाच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध पूर्वीप्रमाणे रुळावर येण्याची आशा आहे, असेही सन वेईंडोंग म्हणाले.
कोणताच देश जगातील इतर देशांपासून वेगळा होऊन विकास साधू शकत नाही. चीन भारताचा एक मोठा व्यवसायिक भागिदार राहिला आहे. चीन आणि भारतीय अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेली आहे. चीन आणि भारतीय अर्थव्यवस्थेने एकमेकांपासून वेगळे न होता, चुंबकाप्रमाणे आकर्षीत करायला हवे, असेही सन वेईंडोंग म्हणाले.