बीजिंग - अरूणाचल प्रदेश दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह आज राज्यामध्ये उपस्थित आहेत. मात्र, चीनने या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. अरूणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असे चीन वारंवार म्हणत आला आहे. त्यामुळेच, शाह यांच्या दौऱ्यामुळे प्रादेशिक सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन होईल, तसेच आपापसातील राजकीय विश्वास देखील ढासळेल, असे म्हणत चीनने या दौऱ्याला विरोध केला आहे.
अरूणाचल प्रदेशचा ३४वा राज्य दिन साजरा करण्यासाठी शाह आज अरूणाचलमध्ये आहेत. यावेळी ते रस्ते आणि व्यापाराविषयक काही प्रकल्पांचीही घोषणा करणार आहेत. चीन वारंवारपणे ईशान्य भारतातील भूभाग आपलाच आहे, असा दावा करत आले आहे. विशेषतः अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय नेत्यांच्या दौऱ्यांना चीन कायम विरोध करत आला आहे.
भारत-चीन सीमेबाबत चीनची भूमीका ही स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच भारतीय नेत्यांना अरूणाचल प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जाण्यापासून विरोध करत आहोत. त्यांच्या असे करण्याने प्रादेशिक सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन होत आहे. तसेच, हे वारंवार होत असल्याने आपापसातील राजकीय विश्वासही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सीमाप्रश्न आणखी ताणला जाईल असे कोणतेही कृत्य भारतीय नेत्यांनी करू नये अशी विनंती आहे, असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : 'भारताला मोठं करण्यासाठी हिंदुत्वाला मजबूत करण्याची गरज'