नवी दिल्ली - गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तणाव निवळण्यासाठी 22 जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर चीनचे सैन्य आणि वाहनांचा ताफा काही प्रमाणात सीमेवरून मागे घेतला आहे. सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात वाहनेही आणून ठेवली होती. मात्र, ती आता मागे घेण्यात आली आहे.
22 जूनला लष्करी अधिकारी स्तरावर झालेल्या बैठकीत सैनिक मागे घेणार असल्याचे आश्वासन चीनने दिले होते. त्यानुसार चीनने सैन्य आणि वाहनांचा ताफा मागे घेतला आहे, असे खात्रीलायक सुत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. 15 जूनच्या हाणामारीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती पावले दोन्ही देशांकडून उचलण्यात येत आहेत.
22 जूनला भारतीय लष्करातील 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनच्या समकक्ष अधिकाऱ्यांमध्ये माल्डो या ठिकाणी चर्चा झाली. दोन्ही देशांच्या मतैक्याने तणाव निवळण्यासंबंधी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांतील करारांचे काटेकोरपणे पालन केले असते तर 15 जूनला सैन्यामधील हाणामारी टाळता आली असती, असे भारताने स्पष्ट केले. चीनकडून संपूर्ण गलवान व्हॅलीवर दावा सांगण्यात येत आहे. मात्र, भारताने चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेचा आदर करावा, तसेच सीमेवरील नियमांचे पालन करण्यावर भारताने चर्चेमध्ये जोर दिला आहे.