रायपूर - छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते 74 वर्षांचे होते. 2000 ते 2003पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. 9 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमामध्ये होते.
काही दिवसांपूर्वीच प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगी हे घरी चिंचा खात असताना, चिंचेचे बी त्यांच्या घशात अडकली. त्यामुळे त्यांचा श्वासोच्छवास थांबला. त्यानंतर कार्डिअॅक अरेस्ट आल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याचे रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले होते.
कोणत्याही उपचारांना ते प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांच्यावर ऑडिओ थेरपीचाही प्रयोग करण्यात आला होता. मात्र, त्यानेही काही फरक पडल्याचे दिसून आले नाही. अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.
जोगी यांच्या कारकीर्दीवर एक नजर...
- अजित जोगी यांचा जन्म 29 एप्रिल 1946ला झाला होता.
- 1968मध्ये त्यांनी मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ मधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.
- 1974मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा यासाठी निवड झाली.
- 1974 ते 1986 यादरम्यान त्यांनी मध्यप्रदेशच्या सीधी, शहडोल, रायपूर आणि इंदौर जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय सेवा बजावली.
- 1986मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षामधून आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली. अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींसाठी त्यांनी केलेल्या कामाची त्यांना यात मदत झाली.
- 1987मध्ये त्यांना मध्य प्रदेशच्या काँग्रेस कमिटीचे जनरल-सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्यात आले.
- 1997 ते 1999 दरम्यान ते काँग्रेसच्या संसदीय समितीचे आणि एआयसीसीचे मुख्य प्रवक्ता होते.
- 2000 सालच्या नोव्हेंबरमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.