रायपूर (छत्तीसगड) - बालोद जिल्ह्यात शनिवारी एका पोलीस कर्मचाऱ्याने एका दीड वर्षाच्या मुलीला सिगारेटचे चटके देऊन तिच्या आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून कॉन्स्टेबल अविनाश राय असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरूवारी रात्री घडलेल्या या प्रकरणानंतर कॉन्स्टेबल अविनाश राय हा फरार होता. त्याला आज (शनिवारी) सकाळी शेजारच्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरात पकडण्यात आले, अशी माहिती बालोदचे पोलीस अधीक्षक जितेंद्रसिंग मीणा यांनी दिली आहे.
मारहाण झालेल्या महिलेचा पती हा नागपुरात राहतो. काही दिवस आधी अविनाशने या महिलेच्या पतीला काही पैसे उसने दिले होते. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी ते पैसे परत घेण्यासाठी हा तिच्या घरी गेला होता. तेथे अविनाशने महिलेच्या लहान मुलीला बाबा म्हणायला सांगितले. तिने नकार दिल्याने तिच्या तोंडावर, पोटात आणि हातावर सिगारेटचे चटके दिले. तसेच तिच्या आईला मारहाण केली. महिलेच्या तक्रारीवरून अविनाश रायविरूद्ध भादंवि कलम 294, 323, 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या पोलीस अधीकाऱ्याविरूद्ध कार्यालयीन चौैकशी सुरू केली असल्याचे पोलिस अधीक्षक जितेंद्रसिंग मीणा यांनी सांगितले..