नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीने परीक्षेच्या वेळी कॉपी आणि फसवणूक केल्याच्या शिक्षेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिला संपूर्ण सेमिस्टर परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात तिने न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने ‘परीक्षेतील कॉपी आणि फसवणूक ही समाजातील महामारी असल्याचे सांगत यामुळे समाज अधोगतीकडे जाईल. हे रोखण्यासाठी कठोर शिक्षेची गरज आहे,’ असे म्हटले आहे.
या विद्यार्थिनीने कॉपी करताना पकडले गेल्यानंतर चूक मान्य करून माफीही मागितली होती. मात्र, त्यानंतरही तिला संपूर्ण परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय झाला, असे तिने याचिकेत म्हटले होते. आरजू अग्रवाल असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिेने बी. ए. अर्थशास्त्र विषयाच्या शेवटच्या वर्षातील परीक्षेत कॉपी केली होती.
न्यायमूर्ती एम. प्रतिभा सिंह यांनी या विद्यार्थिनीच्या याचिकेवर सुनावणी घेतली. 'कॉपी आणि फसवणूक ही देशाला आणि शिक्षणव्यवस्थेला लागलेली महामारी आहे. अशा बाबी कोणत्याही कारवाईशिवाय सोडून दिल्या गेल्या तर याचे मोठे दुष्परिणाम आहेत. परीक्षामंडळाने योग्य पद्धतीने परीक्षा घेणे, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी त्या प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने तयार करणे, परीक्षेच्या नियमांचे पालन होणे, विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे प्रामाणिकपणे परीक्षा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावर देशाची प्रगती आणि शिक्षण व्यवस्थेचे अबाधित्व अवलंबून आहे,' असे त्या म्हणाल्या.
विद्यार्थिनीने आपले याआधीचे वर्तन केव्हाही चुकीचे नसल्याचे सांगत आपल्याविषयी सहानुभूतीने विचार करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने तिच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच, ‘याचिकाकर्त्याचे वर्तन चुकीचे होते. तिने ज्या पद्धतीने अनैतिक मार्गाचा वापर केला, तिला शिक्षा होणे आवश्यक होते,’ असे सांगून न्यायालयाने ही याचिका फेटाळली. याआधी विद्यार्थिनीने या परीक्षेतील तीन पेपर दिले होते. मात्र, त्यांच्या निकालासह संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. न्यायालयानेही कोणताही दिशानिर्देश न देता हाच निर्णय कायम ठेवला आहे.