रायपूर - छत्तीसगडमधील दंतेवाडापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोलकल पर्वतावर एकदंत गणपतीची एक पुरातन मूर्ती स्थापन आहे. ही मूर्ती अतिशय दुर्लभ आहे. या गणपतीबाबत प्रचलित एका दंतकथेनुसार या पर्वतावर परशुराम आणि गणपतीमध्ये एक युद्ध झाले होते. यात परशुराम यांचे आयुध 'परशु'च्या वाराने गणपतीचा एक दात तुटला होता आणि त्यानंतरच गणपतीला एकदंत हे नाव प्राप्त झाले असे म्हणतात.
ढोलसारखी आकृती असल्याने या पहाडाला ढोलकल असे नाव पडले. या पहाडावर जवळपास दीड हजार फूट उंचीवर गणपतीची ही दुर्लभ मूर्ती विराजमान आहे. पर्वताच्या नावावरुनच या गणपतीला ढोलकल गणेश असेही संबोधले जाते. या मूर्तीला चार हात असून उजव्या हातात परशु, डाव्या हातात तुटलेला एक दात तर अन्य एका हातात अक्षरमाळा आणि मोदक आहेत. विशेष म्हणजे बाप्पांची ही मूर्ती आयुध रुपातील असून बाप्पा येथे ललितासन मुद्रेत बसलेले आहेत. बाप्पांची अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कुठेही पहायला मिळालेली नाही.
इतिहास -
या मूर्तीची स्थापना ११ व्या शतकात छिंदक नागवंशी राजांनी दंतेवाडा क्षेत्राच्या रक्षक स्वरुपात ढोलकल पहाडावर केली होती. येथील गणपतीच्या हातात आयुध स्वरुपात परशु, या घटनेची साक्ष देत असून याच कारणाने नागवंशी राजांनी या मूर्तीची स्थापना इतक्या उंच शिखरावर केली. नागवंशी राजांनी या गणपतीच्या मूर्तीची निर्मीती त्यावर नाग अंकित केला आहे. मूर्तीच्या संतुलनासाठी शिल्पकारांनी त्यावर साखळीचा उपयोग केला आहे.
दक्षिण बस्तरच्या भोगा आदिवासी समाज आपली उत्पत्ती 'ढोलकट्टा' ढोलकलच्या महिला पुजारीपासून झाल्याचे मानतात. सर्वात आधी भोगा जनजातीच्या महिलेनेच येथे पुजा सुरू केली असे मानले जाते. पहाटेच्या वेळी या महिला पुजारीच्या शंखनादाने संपूर्ण ढोलकल पर्वत शिखर गुंजायचे असे सांगितले जाते. आजदेखील या महिला पुजारीचे वंशज या ढोलकल गणपतीची पूजा करतात.
या गणपतीची मूर्ती ही येथील इंद्रावती नदीच्या खोऱ्यातील दगडांपासून तयार करण्यात आली आहे. बैलाडील पर्वत रांगेचे हे सर्वात उंच शिखर असून पहाडावरील २ वर्गमीटरच्या क्षेत्रात तिची स्थापना करण्यात आली आहे. ११ व्या शतकातही इतक्या समृद्ध पद्धतीने मूर्तीची रचना केली जात असल्याचे या मूर्तीवरुन स्पष्ट होते. दरवर्षी या पर्वताखाली असलेल्या फरसपाल या गावात ३ दिवसीय जत्रेचे आयोजन केले जाते. या दरम्यान परशुराम, ढोलकल गणपतीसह येथील स्थानिक देवी देवतांची पूजा केली जाते.
प्रचलित दंतकथा -
या गणपतीबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत त्यातील एक कथेनुसार, ढोलकल पर्वत शिखरावर गणपती बाप्पा आणि परशुरामाचे एक युद्ध झाले होते. या युद्धादरम्यान गणपतीचा एक दात तुटला, आणि त्यानंतर गणपतींना 'एकदंत' हे नाव प्राप्त झाले. या घटनेची आठवण म्हणून छिंदक नागवंशी राजांनी येथे गणपतीची ही मूर्ती प्रस्थापित केली. परशुरामाच्या 'परशु' या आयुधमुळे गणपतीचा दात तुटला होता त्यामुळे, पहाडाखाली असलेल्या गावाचे नाव फरसपाल असे पडले.
ढोलकल पर्वतावरील या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुरातन गणपतीच्या मूर्तीवर कुठल्याही प्रकारचे छत किंवा गुंबद नाहीये. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जवळपास अडीच तासांचा प्रवास करुन उंच पहाडावर चढाई करावी लागते. छत्तीसगडच्या सर्वात उंच असलेल्या पहाडावरील या गणपतीचे दर्शन घेण्याकरता नदी, ओढे नाले पार करुन जावे लागते, त्यामुळे या मूर्तीच्या दर्शनाकरता येथे कमीच लोक येत असतात. त्यामुळे येथील स्थानिकच या मूर्तीची पूजाअर्चना करत असतात. या क्षेत्राला विकासाची गरज आहे. राज्य शासन आणि पर्यटन विभागाने लक्ष घातल्यास या क्षेत्राची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचू शकेल आणि देशभरातील पर्यटकांसाठी येथे येण्याचा मार्ग मोकळा होईल.