दंतेवाडा - छत्तीसगढ राज्य सरकारने कुपोषण निर्मूलनासाठी नवी योजना चालू केली आहे. यानुसार लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि तरुण मुलींना कुपोषणापासून मुक्त करण्यासाठी दररोज पोषक पदार्थांचा समावेश असलेला आहार देण्यात येत आहे.
बस्तार जिल्ह्यातील गजनार गावातून पोषक आहाराच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावातील अंगणवाडी केंद्रावर पोषक घटकांचा समावेश असलेला आहार दिवसातून एकदा देण्यात येत आहे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, भात, अंडी आणि चपातीचा समावेश करण्यात आला आहे.
पोषक आहाराची योजना अजून ३ गावात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. योजना बस्तार जिल्ह्यात टप्प्या टप्याने सुरू करण्यात येणार आहे. जवळपास २८ हजार ७०० लोकांना याचा फायदा होणार आहे. या योजनेसाठी कोणत्याही बाह्य मनुष्यबळाचा वापर करण्यात येत नाही. कुपोषण निर्मूलनासाठी गावकरी स्वत: भाग घेत काम करत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेते मुख्य कार्यकारी अधिकारी सचिदानंद आलोक यांनी दिली आहे.
पोषक आहार पुरवण्याबरोबरच नागरिकांची दर ६ महिन्यांनी आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. यामध्ये अॅनेमिया, स्थानिक रोगांची लक्षणे आणि रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. याद्वारे योजनेचा फायदा किती जणांना झाला, याची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ३६ टक्के कुपोषण आहे. या योजनेद्वारे ६ महिन्याच्या कालावधीत ही टक्केवारी १० च्या आत आणण्याचा उद्देश आहे, असेही आलोक यांनी सांगितले.
येथील लोक मजुरी आणि शेती करत असल्यामुळे मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. बस्तार जिल्ह्यातील आदिवासी फक्त भातच खातात. त्यामुळे ही योजना राबवण्यात अडचणी आल्या. अंगणवाडी सेविकांनी आदिवासी लोकांना पोषक आहाराचे महत्व समजावून सांगितले. त्यामुळे, आदिवासी लोक आता आनंदाने पोषक आहार घेत आहेत, असे अंगणवाडी सेविका विजय लक्ष्मी यांनी सांगितले.