डेहराडून - चारधाम यात्रा 30 जूनपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय उत्तराखंड देवस्थान मंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रविनाथ रमन यांनी दिली. वाढत्या कोरोना प्रसारामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही यात्रा 30 जूनपर्यंत होणार नाही.
हिमालयीन परिसरातील बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार मंदिरांचे दर्शन चारधाम यात्रेत असते. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे 30 जूनपर्यंत चारधाम यात्रा सुरु न करण्याची विनंती मंडळाने प्रशासनाकडे केली आहे. ही चारही मंदिरे खुली करण्यात आली आहेत, मात्र, भाविकांना प्रवेश देण्यात आलेला नाही.
उत्तराखंडमधील प्रसिद्ध मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचे नियोजन सरकारने सुरु केले होते. मात्र, पुजारी आणि मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर खुले करण्यास नकार दिला. त्यामुळे आता चारधाम यात्रेबाबत निर्णय 30 जूननंतर घेण्यात येणार आहे.