नवी दिल्ली - २०२१च्या सुरूवातीला चांद्रयान-३ ही मोहीम पार पाडण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. पंतप्रधानांच्या कार्यालयात राज्यमंत्री असणाऱ्या सिंह यांनी लोकसभेत हे स्पष्ट केले.
रविकुमार डी. यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात सिंह यांनी सांगितले, की याआधी झालेल्या चांद्रयान-२ पासून अनुभव घेत, चांद्रयान-३ मोहिमेची तयारी सुरू आहे. यामध्ये विशेष असे डिझाईन आणि क्षमता असणार आहे.
मागील वर्षी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने चांद्रयान-२ चे प्रक्षेपण केले होते. या मोहिमेमध्ये 'विक्रम लँडर' हे चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी ठरले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वीच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता.
दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सिंह यांनी सांगितले, की इस्रोने युवा वैज्ञानिकांसाठी एक अभियान सुरू केले आहे. २०१९ पासून देशातील सरकारी शाळेतील मुलांसाठी इस्रो युवा वैज्ञानिक अभियान राबवत आहे. इस्रोतर्फे या अभियानासाठी देशातील प्रत्येक सरकारी शाळेत शिकत असणाऱ्या, नववीतील विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा : व्हिडिओ : वाघिणीच्या हल्ल्यात युवक ठार; रांची प्राणी संग्रहालयातील प्रकार