श्रीहरीकोटा - भारताच्या मिशन चांद्रयान-2 मोहिमेला सुरू होण्यास आता काही तासच बाकी आहेत. रविवारी संध्याकाळी ६.४३ मिनिटांनी या मोहिमेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांनी चंद्रयान-२ अवकाशात उड्डाण घेणार आहे.
२२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपण होणार आहे. ५ जुलैला सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. मात्र, तांत्रिक कारणाने ते केवळ ५६ मिनिटे आधी उड्डाण रद्द करण्यात आले होते.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चांद्रयान-2 अवकाशात उड्डाण घेणार आहे. लॉन्चिंगनंतर 54 दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहचेल. इस्रोच्या या वाटचालीकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.
चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहा वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे. भारताचे चांद्रयान -२ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे यान आहे. भारताला या मोहिमेसाठी एकूण ९७८ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. याआधी 'नासा'ने 1969 मध्ये अपोलो हे यान चंद्रावर पाठवले होते. चांद्रयान-१ आणि मंगलयानच्या यशानंतर भारत आता पुन्हा एकदा नव्या मोहीमेसाठी सज्ज झाला आहे.