हिमायतनगर - गुजरातमधील साबरकंठा येथील ताधीवेडी गावात एक मृतदेह ८ महिन्यांपासून झाडाला टांगून ठेवण्यात आला आहे. आठ महिन्यांपूर्वी गावात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. पोलिसांनी ही घटना आत्महत्येची असल्याचे म्हटले होते. मात्र, या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांनी न्यायाच्या मागणीसाठी हा मृतदेह ८ महिन्यांपासून झाडाला लटकवून ठेवला आहे.
स्थानिक पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारे तक्रार दाखल करून घेतली होती. मात्र, मृत मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला होता. तिच्या नातेवाईकांनीच त्याची हत्या केली असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या संशयाच्या आधारे या प्रकरणी नातेवाईकांनी न्याय मागितला आहे.
न्यायासाठी मृतदेह झाडाला लटकवून ठेवण्याची प्रथा या आदिवासींमध्ये आहे. 'छाडोतारू' असे या प्रथेचे नाव आहे. पोशिना, खेद्राहमा, वडाली, विजयनगर येथे ही प्रथा पाळली जाते. या प्रथेमध्ये कोणत्याही अनैसर्गिक मृत्यूमध्ये तो घडवून आणणाऱ्या संशयितांनी मृताच्या नातेवाईकांना काही रक्कम देणे बंधनकारक असते. ही रक्कम नंतर पीडित व्यक्ती आणि समाजातील नेत्यांमध्ये वाटून दिली जाते.