नवी दिल्ली - विशाखापट्टनम येथील एल. जी पॉरिमर कंपनीत मागील आठवड्यात गॅस गळती झाली. या दुर्घटनेत हजारो टन गॅस वातावरणात पसरला गेला. या दुर्घटनेत कारखान्याशेजारच्या गावांमधील ११ जणांचा मृत्यू झाला, तर एक हजारापेक्षा जास्त नागरिक विषारी गॅसमुळे बेशुद्ध पडले. स्टायरीन वायू मानवासाठी धोकादायक असून त्याचे परिसरात दुरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एक वर्ष या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा, असे केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारला सांगितले आहे.
वायूगळतीमुळे भविष्यात काय परिणाम होतील यासंबंधी केंद्र सरकारने तज्ज्ञ समितीद्वारे अभ्यास सुरू केला आहे. यासाठी तज्ज्ञांचे एक पथक नेमण्यात आले आहे. त्यामध्ये कौन्सिल ऑफ इंडस्ट्रीयल रिसर्च, नॅशनल एनव्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, आंध्रप्रदेश प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वायूमुळे परिसरावर काय परिणाम झाला असेल याचा अभ्यास करण्यात येत आहे.
वायू पसरलेल्या भागातील भाजीपाला, फळे, अन्नधान्य नागरिकांनी खाऊ नये तसेच प्राण्यांनाही खाऊ घालून नये, असे निर्देश तज्ज्ञ पथकाने दिले आहेत. या परिसरातील पाणी पिण्यासही पथकाने निर्बंध घातले आहेत. पाणी, जमीन आणि हवेवर वायूचा काय परिणाम झाला या पथक अभ्यास करत आहे. नजिकच्या काळासह भविष्यात पुढे जाऊन काही अडचणी येतील का? याचा पथकाकडून अभ्यास करण्यात येणार आहे.