नवी दिल्ली - राज्य सरकारांना कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा राज्याचा दौरा करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल या पथकाचे नेतृत्त्व करणार आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या पथकाकडून घेण्यात येणार असून राज्यांना उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.
कोरोनाचे नियंत्रण अधिक प्रभाविपणे करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर केंद्रीय पथक चर्चा करणार आहे. चार दिवसाचा हा दौरा असून देशामध्ये दुसऱ्या अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आल्यानंतर दौरा आखण्यात आला आहे. 26 ते 29 जून या चार दिवसांत पथक राज्यांना भेटी देणार आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 42 हजार 900 वर पोहचला आहे. तर गुजरातमध्ये 28 हजार 943 कोरोनाबाधित आहेत. तेलंगाणामध्ये 10 हजार 444 कोरोना बाधित रुग्ण झाल्याने राज्यापुढे चिंता वाढली आहे. सर्व राज्यातून लॉकडाऊन उठविण्यात आले असले तरी कंटेन्मेंट भागात निर्बंध लादण्याची मागणी केंद्रीय प्रशासनाने केली आहे.
जगातील कोरोनाच्या आकडेवारीचा विचार करता भारतात दर लाख लोकसंख्येमागे एकूण कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. देशामध्ये दर 1 लाख लोकसंख्यमागे 33.39 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर जगात ही सरासरी 120,21 आहे. देशामध्ये सद्यस्थितीत 1 लाख 86 हजार 514 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशभरातील 1 हजार 7 प्रयोगशाळांद्वारे 75 लाख 60 हजार 782 नागरिकांची चाचणी घेण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.